InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत ; पुनर्वसन देखील करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण भारत आज उद्विग्न आहे. सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. जम्मू व काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश आहे, असे सांगून या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत व कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा व सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत दिव्यांगांना सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुमन पाटील, आमदार सर्वश्री अनिल बाबर, डॉ.सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सांगली – मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, तासगावचे नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नितीन शिंदे आणि राजेंद्र देशमुख, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.त्रिगुण कुलकर्णी आदि उपस्थित होते.

पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकिस्तान आगळीक करत असून, त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे प्रतिपादित करून त्यांनी शहीद जवानांच्या प्रती आदरांजली व्यक्त केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण सर्व लोक भारतमातेची लेकरे आहोत. जात, धर्म, पंथ यांच्या नावावर भेद करू नये. आपली संस्कृतीच वसुधैव कुटुंबकम् आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे एकाच वेळी लोकार्पण हा सोहळा आगळा वेगळा असल्याबद्दल अभिनंदन करून या ठिकाणी मुस्लीम बांधवांनी 20 हजार फूड पॅकेट्स दिली आहेत, ही बाब दुधात साखर अशीच आहे. या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या झेंड्यानिशी आले आहेत व त्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येत आहे, ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना संघर्षासाठी तयार केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य माणसांमध्ये पौरूष जागृत करून परकीय आक्रमकांविरूद्ध लढायला तयार केले. त्यांचे राज्य हे केवळ स्वराज्य नव्हते तर ते सुराज्य होते. ते खऱ्या अर्थाने जनतेचे, रयतेचे राज्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्या राज्यघटनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तत्त्वे आणि मूल्ये रुजवून, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रूजवण्याचा प्रयत्न केला. जाती धर्म, पंथाच्या नावाखाली असणारी दुफळी नाहिशी करून प्रत्येकाला समानतेने जगण्याचा अधिकार दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात अथक संघर्ष केला. पण, त्या संघर्षातून त्यांनी मनात कुठलीही कटुता ठेवली नाही. त्यांनी दिलेल्या संविधानाने समाजातील सर्व घटकांना विकासासाठी समतेचे व समानतेचे माध्यम उपलब्ध करून दिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवराय व इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक किर्तीची स्मारके उभारण्यात येत असल्याचे सांगून महामानवांच्या स्मारकांमधून जगण्याची प्रेरणा, ऊर्जा, स्फूर्ती मिळत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील 6 हजार 656 दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम अत्यंत चांगला असल्याबद्दल कौतुक केले व प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांगांना उपकरणांचे वितरण केले. 2022 पर्यंत सर्वांकरिता घरे ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचे सांगून प्रधानमंत्री आवास योजनेतून 356 लाभार्थींना देण्यात येत असलेल्या धनादेशांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण केले. तासगाव नगरपालिकेच्या भुयारी गटार योजना व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन केले. नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण आणि कृषि विभागांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत लाभार्थीला ट्रॅक्टरची प्रतिकात्मक चावी प्रदान करण्यात आली. या सर्व उपक्रमांमधून कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील यांनी उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणावर व गतीने मार्गी लावल्या असून त्यातून या भागाचे चित्र निश्चितपणे बदलेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध समाजांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. गरिबांकरिता 10 टक्के आरक्षण दिल्याने आरक्षण नसलेल्या मुस्लीम समाज, ख्रिश्चन समाजालाही न्याय देण्यात येत आहे. विविध निर्णय उपक्रमांच्या माध्यमातून सबका साथ, सबका विकास या विचाराने शासन कार्य करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे मावळे होते. जात धर्म भाषा पंथ सारे विसरून एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. शाळेच्या बाहेर राहून शिक्षण घेतलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. आपल्या लेखणीने सारे जग जिंकले. त्यांनीही देश सर्वोच्च स्थानी असला पाहिजे, हीच शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे अनावरण व लोकार्पण हा सोहळा सामाजिक एकोप्याचा, सुसंवादाचा आहे. या दोन्ही महामानवांच्या चरित्रांमधून स्फूर्ती मिळते, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती, पिण्याचे पाणी यांचा प्रश्न मिटला पाहिजे, यासाठी नदीजोड कार्यक्रम हाती घेतला होता. शासन या संकल्पनेला गती देत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली असून, केंद्र शासनही याबाबत सकारात्मक आहे. केंद्राचे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी काम सुरू आहे. 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सवर्णांना आरक्षणाची भूमिका शासनाने घेतली आहे. इंदू मिलची 3600 कोटी रुपयांची जमीन केंद्र शासनाने राज्य शासनाला दिली असून, त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरच उभारण्यात येत आहे. ॲट्रॉसिटी कायद्याला संरक्षण देत असताना गैरवापर होऊ नये, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

समाजा-समाजातील तेढ संपवण्यासाठी भरीव कार्य होणे आवश्यक असल्याचे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी खासदार संजय पाटील करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी अभिनंदन केले. सर्व माणसांच्या शरीरात एकाच रंगाचे रक्त असून, कोणताही भेदभाव असू नये, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, जातीभेदाच्या सर्व भिंती दूर करून सर्व समाजांनी एकत्र यावे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रांतून सर्वांनी हीच प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सांगली जिल्ह्याला क्रांतीकारकांची मोठी परंपरा असल्याचे सांगून प्रास्ताविकात कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील म्हणाले, विविध जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने येथे एकत्र राहतात. यावेळी त्यांनी मराठा समाजाची आरक्षणाची अनेक वर्षांची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही लवकर सोडवावा, अशी मागणी केली. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून 2092 कोटी रुपये व बळीराजा जलसंजीवनी योजनेतून 1200 कोटी रुपये केंद्र शासनाने दिल्याने उपसा सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून साडे सात हजार कोटी रुपयांचे रस्ते, रेल्वेचे दुहेरीकरण, ड्राय पोर्ट, इथेनॉल व साखरेला दिलेला दर या साऱ्यांबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. तसेच, त्यांनी शिवज्योत घेऊन येत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत दिल्याबद्दल आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्याच्या विकासाला सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. जत तालुक्यातील 42 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी जशास तसे प्रत्युत्तर द्यावे, ही लोकभावनाही व्यक्त केली.

यावेळी मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, रमेश शेंडगे, वैभव नायकवडी, दीपाली पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासकामांची माहिती

तासगाव नगरपरिषदेस शासनाकडून 111 कोटी 89 लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. यामधून नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, शॉपिंग सेंटर इमारत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, शहराच्या विस्तारीत भागातील विविध रस्ते विकास कामे, मुस्लीम समाज कब्रस्थान सुशोभिकरण, जैन मंदिर सुशोभिकरण, नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब वाटप, नगरपरिषद शाळांना प्रोजेक्ट वाटप, संपूर्ण शहरात सी.सी.टी.व्ही बसविणे, शहरातील इतर विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

तासगाव शहरासाठी 68 कोटी प्रकल्प किंमतीची भुयारी गटार योजना मंजूर केली असून त्यामधील टप्पा क्र. 1 साठी 43 कोटी 83 लाख रूपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत. तासगाव नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 356 घरकुलांसाठी प्रत्येकी 2 लाख 50 हजार प्रमाणे 8 कोटी 90 लाख रूपये मंजूर केले असून त्यापैकी प्रत्येकी घरकुलासाठी 40 हजार रूपये प्रमाणे 1 कोटी 42 लाख अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल निधी वाटप करण्यात आले.

यावेळी नगरपालिका प्राथमिक शाळांना ई लर्निंग सुविधा व डिजिटल क्लासरूम या बाबीखाली 21 लाख 71 हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून प्रातिनिधीक स्वरूपात नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.