InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तिघांविरोधात गुन्हे

पुणे : पत्रकार तसेच पत्रकाराच्या पत्नीबद्दल सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन बाळासाहेब कुंभार अशी या तिघांची नावं आहेत. पत्रकार कृष्णा वर्पे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

कृष्णा वर्पे पुण्यातून थोडक्यात डॉट कॉम नावाने न्यूज पोर्टल चालवतात. मोहसीन, महादेव आणि सचिन गेल्या काही दिवसांपासून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने त्रास देत आहेत. त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. मात्र गुरुवार (दि. 14) रोजी मोहसीन शेखने कृष्णा वर्पे यांना फोन करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा तसेच ऑफीसचा पत्ता विचारुन धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री महादेव आणि सचिन यांनी कृष्णा यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह तसेच लज्जास्पद लिखाण केलं. तर मोहसीनने कृष्णा आणि इतर पत्रकारांविषयी अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट लिहिली.

स्वतःची आणि पत्नीची सोशल मीडियाद्वारे बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी त्यांनी तिन्ही आरोपींविरोधात तक्रार देत पुरावे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील महादेव बालगुडे याच्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांचं बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. देव गायकवाड नावाच्या बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून त्याने हे कृत्य केलं होतं. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अजित पवार यांना फैलावरही घेतलं होतं.

दरम्यान, राम कदम यांनी मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सळो की पळो करुन सोडलं होतं. आपल्या कार्यकर्त्यांच्या या कृत्यांवर त्या काय भूमिका घेतात? हा प्रश्न आहे.

एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगत असतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे कार्यकर्ते पत्रकारांना धमकावण्याचे काम करत आहेत. महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात आता याकडे देखील तमाम मिडियाचे लक्ष असणार आहे.

राम कदम यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या पुणे शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील निष्पक्ष अशी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. महिलांचा अवमान करणाऱ्या राम कदम यांना कोल्हापुरी चपलेने मारू, अशी जाहीर भूमिका घेऊन स्वाभिमानी बाणा दाखविणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सक्षणा सलगर या देखील सत्याच्या बाजूने उभ्या राहतील अशी अपेक्षा आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले इसम हे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणातील मोहसीन शेखचा काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून ‘शिलेदार राष्ट्रवादीचे’ म्हणून गौरव केला होता.

(Source – Maharashtra Desha )

CLICK HERE TO FIR COPY DOWNLOAD

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.