अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल पालकमंत्री संजय बनसोडे

नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याची सूचना

परभणी दि. 17 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन जास्तीत जास्त मदत जिल्ह्याला मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे  क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषि, महावितरण, आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात झालेले पर्जन्यमान, पंचनाम्याची स्थिती, नुकसान, मदत कार्य याबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

 

पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये झालेल्या नुकसानीचे शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, खरडून गेलेल्या जमिनी, मयत जनावरे व इतर नुकसानीचा  सविस्तर अहवाल शासनाकडे येत्या चार दिवसांत सादर करावा. नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल.  शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाईनसह ऑफलाईन तक्रार अर्ज देखील स्विकारण्याची कार्यवाही करावी. महावितरणने दुरुस्तीसाठी निधीची तातडीने मागणी करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पूल, रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी देखील प्रारुप प्रस्ताव दाखल करण्यात यावा.

यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांनी जाणून घेतली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केली.

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय बनसोडे यांनी केले अभिवादन

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्री संजय बनसोडे परभणी येथे आले असतांना केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते.

*-*-*-*