अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. १५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघाच्या विक्रोळी येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १४ मे पासून टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावे, असे आवाहन मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.

१४ मे रोजी विक्रोळी येथील पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील १६०६ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत साधारण ७०० मतदारांनी मतदान केले आहे. गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ५  पर्यंत ही प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करावे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले आहे.

०००