अमरावती जिल्हा परिषदेतील स्वीप कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. २३ (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीप कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या सभागृहात वॉल ऑफ प्राऊड वोटरची संकल्पना साकारण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी वॉल ऑफ प्राऊड वोटर ही संकल्पना अभिनव आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्याने सर्व विभागांचा यात सहभाग महत्वाचा आहे. मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शी पद्धतीने आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राबविल्या जाते. त्यामुळे या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानासाठी यावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पिंक आर्मी, वीज देयकावरील मतदानाची आवाहन, विविध सामाजिक संघटनांना मतदार जागृती अभियानात सामावून घेण्यात आले. यामुळे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली आहे. यावेळीही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सर्व विभागांनी पुढे यावे. सहयोगासाठी नागरीक चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यात त्यांचा सहभाग घ्यावा. नागरिकांपर्यंत वोटर स्लीप पोहोचविल्यास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त श्री. कलंत्रे यांनी, शहरी भागात मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कर्मचारी आणि नागरिकांचे मतदान होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेत विशेष सुविधा केली जाईल. यावर्षी नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यांचे मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन केले.

पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी मतदान जागृतीसाठी पोलिस विभागातर्फे संपूर्ण सहकार्य केल्या जाईल. तसेच सर्व पोलिसांचे मतदान होण्यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. पोलिसांचा सक्रिय सहभागामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. आनंद यांनी लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन मतदान करावे. मतदानासाठी पोलिस विभागातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्रीमती मोहपात्रा यांनी प्रास्ताविकातून स्वीप उपक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगितले. मतदारांना समर्पित असे वॉल ऑफ प्राऊउ वोटर तयार करण्यात आले आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. सुरवातीला जनजागृती कक्षाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानेश्वर घाटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय राठी यांनी आभार मानले.

०००

 

The post अमरावती जिल्हा परिषदेतील स्वीप कक्षाचे उद्घाटन first appeared on महासंवाद.