अमीन सयानींचा आवाज कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली संवेदना            

मुंबई, दि. २१ : अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक आणि आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील.” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणतात की, रेडिओ विश्वातील आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. भारतात आकाशवाणीला लोकप्रिय बनविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ‛बिनाका गीतमाला’ च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात त्यांचा आवाज पोहोचला होता. अलीकडेच त्यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेऊन एका दिग्गज कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाले. रेडिओ विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, लिविंग लिजेंड अवार्ड, पर्सन ऑफ द इयर, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने आवाजाच्या कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

000

दीपक चव्हाण/विसंअ/