अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १०: नागरिकांच्या आरोग्याकरीता आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

आंबेगाव (बु) येथे चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित ‘आरोग्यसाथी-जपू या ऐश्वर्य आरोग्याचे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विजय रेणुसे, माजी उपमहापौर दिपक मानकर, दत्ता धनकवडे, रमेश कोंडे देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम व प्रभावी करण्यावर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग भर देत आहे. नागपूरप्रमाणे पुण्यातील औंध येथे एम्स रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंत मोफत उपचार, अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत १ हजाराहून १ हजार ९०० पर्यंत वाढ, प्रत्येक जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयाची स्थापना, शववाहिका, आरोग्यवर्धिनी केंद्र, मोफत व पुरेशा आरोग्य सुविधा देण्याच्याअनुषंगाने विविध निर्णय घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

चुकीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी आहार, विहार, आचार, विचार आणि उच्चार चांगला ठेवला पाहिजे. दररोज व्यायाम करायला हवा, निरोगी आयुष्य जगले पाहिजे. पुणे हे विद्यचे माहेरघर आहे. ते सुरक्षित राहावे, येथे निरोगी आणि सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी, जनतेच्या निरामयी आरोग्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सामूहिक आणि एकत्रित प्रयत्नांतून अवघा महाराष्ट्र आरोग्यसंपन्न व्हावा, सगळ्यांना निरामय आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा श्री.पवार यांनी व्यक्त केली.

सदृढ, सशक्त, निरोगी समाज निमिर्ती आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद करून श्री.पवार म्हणाले. ‘आरोग्यसाथी-जपू या ऐश्वर्य आरोग्याचे’ पुस्तकातून समाजहित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्यसाथी’ पुस्तक उपयुक्त आहे.

राज्यातील आरोग्य क्षेत्रच्या माहितीचा आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. नागरिकांसाठी हे पुस्तक माहिती व मार्गदर्शन देणारा एक विश्वासू साथी ठरणार आहे. यातील ज्ञानाचा समाजातील सर्व घटकांना उपयोग होईल, आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी लिहिलेल्या लेखांमुळे आरोग्याविषयी सजगता निर्माण होण्यास मदत होईल. संदर्भ व संग्राह्यमूल्य असणाऱ्या पुस्तकामुळे नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंबेगाव परिसरातील विकासाला गती देण्यात येईल अशी ग्वाही देऊन ते म्हणाले, आगामी काळात या परिसरात विकास आराखड्यातील रस्ते करण्यात येतील. महानगरपालिकत नव्याने समावेश झालेल्या गावांचा कराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जांभुळवाडीचा तलाव महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेगाव परिसरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. रेणुसे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात आपली जीवनशैली बदललेली असून त्याचे दुष्परिणाम समाजात दिसून येत आहे. सर्व सामान्य नागरिकांना आरोग्याबद्दलची जाणीव होण्याबरोबरच त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन होण्यासाठी ‘आरोग्यसाथी-जपू या ऐश्वर्य आरोग्याचे’ पुस्तक उपयोगी पडणार आहे. केंद्र व राज्य शासन, पुणे महानगरपालिकेच्या योजना, ट्रस्टच्या माध्यमातून होणारी मदत, विविध आरोग्य विषयक सोई-सुविधेबाबत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.