अवकाळी पाऊस, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ११ : चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात शनिवारी (१० फेब्रु) झालेला अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

१० फेब्रवारी रोजी जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभूर्णा या तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट तर  ब्रम्हपुरी, नागभीड, राजूरा, कोरपना, मूल व इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हरभरा, गहु, तूर, ज्वारी, जवस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, असे निर्देश मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पालकमंत्री कार्यालयालाही सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

आपदग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून कोणीही मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

०००