आदिवासी विकास विभागाचा ‘सेंट्रल किचन’ उपक्रम अनुकरणीय; झारखंड राज्यात रांचीमध्ये नंदुरबारच्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

नंदुरबार, दिनांक २६ (जिमाका) : आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबवलेला सेंट्रल किचनचा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जात आहे, हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंड सारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची येथे राबवण्याचा मानस असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प (नंदुरबार) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. जिल्हा नियोजन अधिकारी अंकुश काळे, सेंट्रल किचनचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांच्यासह विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

c04903b2 9e05 42cc be1c 666e85494453 आदिवासी विकास विभागाचा ‘सेंट्रल किचन’ उपक्रम अनुकरणीय; झारखंड राज्यात रांचीमध्ये नंदुरबारच्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

यावेळी सेंट्रल किचन या योजनेचे कौतुक करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ म्हणाले, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाने राबवलेल्या नंदुरबार येथील सेंट्रल किचन या योजनेबाबत आज जाणीवपूर्वक प्रत्यक्ष भेट देवून माहिती करून घेतली. एकाच स्वयंपाक घरातून शिजलेले अत्यंत स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टिक व उल्लेखनीय म्हणजे कडधान्येयुक्त अन्न आदिवासी आश्रम शाळांमधील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते आहे. आदिवासी मुलांमधील पोषण आहाराच्या समस्येवर परिणामकारक व परिपूर्ण अशी ही सेंट्रल किचन ची संकल्पना आहे. शिजवलेले अन्न अगोदर ज्यांनी तयार केले आहे, ते अगोदर चाखतात त्यामुळे त्या अन्नातील अत्यावश्यक घटक व पौष्टिकता तसेच प्रमाणबद्धता एकप्रकारे प्रमाणित केली जाते. त्यामुळे सकस आहारासाठीची मिड डे मिल ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पनेतील स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या निकषांवर आधारित त्रिसुत्री येथे प्रत्यक्षात यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी सांगितले.

da5713b8 c4c8 4d0d 80b3 63c0c9cf0dd4 आदिवासी विकास विभागाचा ‘सेंट्रल किचन’ उपक्रम अनुकरणीय; झारखंड राज्यात रांचीमध्ये नंदुरबारच्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण सेंट्रल किचन ची कार्यपद्धती जाणून घेतली. उपलब्ध यंत्रसामग्रीचा उपयोग करताना त्यातील अन्नधान्य व भाजीपाला यांची पौष्टिकता कशी जपली जाते, या बाबतचे बारकावेही त्यांनी जाणून घेतले. सेंट्रल किचनसाठी  काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच तेथे तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचा आस्वादही घेतला.

०००००

 

The post आदिवासी विकास विभागाचा ‘सेंट्रल किचन’ उपक्रम अनुकरणीय; झारखंड राज्यात रांचीमध्ये नंदुरबारच्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ first appeared on महासंवाद.