आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती

मुंबई, ‍‍दि. १३ : पदभरती करताना सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन:श्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे या विभागाची दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेली पदभरती जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आदिवासी विकास विभागातील ६०२ विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदभरतीत जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाईन प्राप्त झाले होते. तथापि दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे. ही जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली असून, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/