आदिवासी विकास विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात २७ हजार घरकुले; एकही पात्र व्यक्ती बेघर राहणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे.

आज धडगाव तालुक्यात विविध विकास कामांचे भूमीपूजन मंत्री डॉ. गावित यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सुभाष पावरा, रुपसिंग तडवी, रामा वळवी, हिरालाल पाडवी, रमेश तडवी, मंगेश तडवी, राजेंद्र तडवी, किशोर तडवी, शिवाजी पराडके, लतिष मोरे,चंदू वळवी व पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील ६५ हजार घरांमध्ये वीज पोहोचावी यासाठी ४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ५५ हजार घरकुलांना वीज दिली जाणार आहे. तसेच जलजीवन मिशन च्या माध्यमातून प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक तेथे फिल्टरही बसवले जाणार आहे. जलजीवन मिशन साठी वीजबिलाचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सोलर प्लांटचीही तरतूद आराखड्यांमध्ये करण्यात आली आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश कुटुंबांचे आजोबा-पणजोबांच्या नावावर रेशन कार्ड असून त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ जर त्या कुटुंबातील आजोबा, पणजोबा ने घेतला असल्यास त्या कुटुंबातील कुणालाही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे रेशन कार्ड स्वतंत्र बनवून घेणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, दवाखाना, शाळा, आश्रमशाळा, ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेवून शासनाने आदिवासी दुर्गम भागासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना आणली असून येणाऱ्या काही दिवसात या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे दुर्गम भागात आपल्याला पहावयास मिळणार आहे.

0000000000