आदिवासी संस्कृती आणि परंपरा जतनाची सर्वांची जबाबदारी – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

विश्व आदिवासी गौरव दिन महोत्सवाची शानदार सांगता
चुकीच्या अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्रांचे पुनर्विलोकन करता येईल

नंदुरबार, दि. ९ (जिमाका) : आदिवासी बांधवांच्या परंपरा आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम 2000) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला, असल्याची माहिती आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

आज येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित विश्व आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य समारंभात मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटीया, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदिप गोलाईत, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतिशा माथुर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार) तसेच राज्यभरातून आलेले विविध समुदायातील आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत  करण्याची तरतूद करण्यात आली आहे.  याशिवाय समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपिलाची तरतूद आहे. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहेत. म्हणून उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपिलिय प्राधिकरण देखील गठीत करण्यात येणार आहे. जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या 2 हजार ते 20 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.  मात्र त्यात वाढ करणे गरजेचे असून आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफआयआर देखील दाखल करण्याची तरतूद करण्यात येईल. समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड लावला जातो.  त्यादृष्टीने देखील सदस्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य तसेच आदिवासींना न्याय देण्यासाठी ज्या क्रांतीकारींनी बलीदान दिले त्यांना अभिवादन करुन ते म्हणाले, जंगल टिकवण्याचे काम आदिवासी बांधवाने केले. आम्हाला चांगले आरोग्य दिले त्यांच्या गौरव करण्यासाठी आजचा दिवस ‘विश्व आदिवासी दिवस’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे आदिवासींचा गौरव केला जातो. आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दिवसाचा उपयोग केला पाहीजे, त्याच अनुषंगाने हा दिवस शासनामार्फत साजरा केला जातो.

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. आश्रमशाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयंम योजनेतून तालुकास्तरावर निधी सुद्धा देणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले,  उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजीटल करत आहोत. सहा महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजीटल होतील. अधिकाऱी आणि शिक्षकांना शिस्त लागली पाहीजे यासाठी नंदुरबार आणि गडचिरोलीच्या सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमॅट्रीक सिस्टीम लावल्या जाणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पोर्टलची सुविधा सुरु केली. यामुळे अर्ज करण्याची सुविधा सुलभ होणार आहे त्यासाठी आज पोर्टलचे उदघाटन करण्यात आले आहे.  स्थलांतर रोखण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षणाची सोय, त्यांना उद्योगाची व्यवस्था करुन देत आहोत.

ते म्हणाले, राज्य शासनाने वैयक्तिक लाभासाठी नवीन योजना सुरु केल्या आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिकवण्यासाठीच्या पुस्तिकेचे प्रकाशन करताना आनंद होत असल्याचे सांगून पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण दिले जाणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटीया यांची समयोचित मनोगते झाली. आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी प्रास्तविक केले.

या उपक्रमांचे झाले लोकार्पण

आदिवासी गौरव गीत

परदेशी शिष्यवृत्ती पोर्टल

सन्मान आदिवासी पुरूष योजना (चंद्रपूर)

एकलव्य कुशल योजना

यांचा झाला सत्कार आणि पुरस्कार समारंभ

नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विजेते शाळकरी विद्यार्थी

रांगोळी स्पर्धेतील विजेत विद्यार्थी

आदिवासी लोकनृत्यात  विविध जिल्ह्यातील सहभागी गट

क्रीडा क्षेत्रात अंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय काम करणारे खेळाडू

रिंकी धन्या पावरा, मु. खर्डी ता. धडगांव – क्रीडाक्षेत्र आंतरराष्ट्रीय धावपटु- 3000 मीटर धावणे.
पायल जितेद्र नाईक, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार – क्रीडाक्षेत्र- नॅशनल हॉकी
अरिता नरेश वसावे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार क्रीडाक्षेत्र- नॅशनल हॉकी
चंचल दारासिंग पावरा, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार क्रीडाक्षेत्र- नॅशनल हॉकी

शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार.

अजय सिताराम भोसले, मु. नवागांव ता. शहादा – शिक्षणक्षेत्र- पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
प्रदिप बाबुलाल पावरा, मु. तलावडी ता. शहादा – शिक्षणक्षेत्र – राज्य विक्रीकर पदी निवड
पवन भरत रावताळे, आडगांव ता. शहादा-शिक्षणक्षेत्र – पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
भोये राजेश चंद्रकांत, पदविधर प्राथमिक शिक्षक, नाशिक प्रकल्प.

योजनांच्या लाभांचे वितरण

न्युक्लीअस बजेट अंतर्गत योजनेतंर्गत 33 लाभार्थ्यांना भजनी साहित्य किट वाटप.

न्युक्लीअस बजेट अंतर्गत योजनेतंर्गत 17 लाभार्थ्यांना क्रिकेट साहित्य किट वाटप.

०००