मुंबई, दि. २३ : कोल्हापूरमधील येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे सांगून त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्व, धडाडीचा लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकरी, पुनर्वसन, कामगार, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
कालच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्याशी बोलून प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मलवल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. मी पी. एन. पाटील यांचे कुटुंबिय, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
०००