आमदार राजेंद्र पाटणी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ : कारंजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राजेंद्र पाटणी यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी असून ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला, जनसामान्यांसाठी सातत्याने लढणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, राजेंद्र पाटणी यांचे सर्वसामान्य जनतेशी अतूट नाते होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू झाली. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. राष्ट्रवादी विचारांच्या श्री. पाटणी यांनी कायम राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनाने अभ्यासू, अत्यंत मृदू स्वभावाचा पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

०००