आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

ठाणे, दि. 28 (जिमाका) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

    सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले.

मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला.

   शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला.

   ‘मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

 

महिला बचतगट मतदार जागृतीमध्ये सहभागी होऊन करत आहेत मतदान जनजागृती

 ठाणे, दि. २८ (जिमाका) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप टीमने भांजेवाडी येथील उतेकर चाळीत महिला बचत गटांच्या महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले.

१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. मतदान प्रक्रियेची माहिती देणाऱ्या रिक्षातून भांजेवाडी, भास्कर कॉलनी परिसरात जनजागृती करण्यात आली.

महिला वर्गात मतदानाबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच मतदार जागरुकता व मतदान टक्का वाढवण्यासाठी उतेकर चाळ, भांजेवाडी, ठाणे येथील महिला बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य आणि इतर महिलाही उपस्थित होत्या.

 महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले.

मतदानामध्ये सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये. शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य, आजूबाजूला राहणाऱ्या महिला,कुटुंबातील सदस्य, नव मतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रमाचा समारोप सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.

मतदान म्हणजे मतदान असतं

  भांजेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी ७४ वर्षे वयाच्या श्रीमती बर्वे म्हणाल्या की, मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या-आमच्यासाठी ते संविधानाचं वरदान असतं!, मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांना ही मतदान करायला सांगणार.

0000