आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध – अध्यक्ष रजनिश सेठ

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष रजनिश सेठ व सदस्यांनी मत व्यक्त केले.

आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात संपन्न झालेल्या आयोगाचा ८७ वा स्थापना दिवस कार्यक्रमास सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अभय वाघ, डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच आयोगाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १ एप्रिल, १९३७ रोजी झाली. स्वातंत्र्यापूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे नामकरण करण्यात आले. आज दिनांक १ एप्रिल, २०२४ रोजी ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवतांना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे या ब्रिद वाक्याप्रमाणेच गेली ८७ वर्षापासून प्रामाणिकपणे आयोग कार्यरत आहे.

****