जिल्ह्यातील महिला बचत गटांना २९२ कोटींचे अर्थसहाय्य
महिला मार्गदर्शन मेळाव्यासाठी लाडक्या बहिणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर, दि. २८ : कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. या बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्याताही ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल. त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंखे, गिरीश धायगुडे, पालिका प्रशासन अधिकारी वर्षा गायकवाड, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, राहुल पावडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झाले, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हा राज्यात प्रथमच असला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कुठेही कमतरता नाही, फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिला बचत गटांना 292 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून यात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 4 लक्ष 70 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 लक्ष 75 हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण 4 लक्ष 70 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे. मात्र अजूनही काही महिलांचे आधार सिडींग नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बचत गटांनी सहकार्य करावे. कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये. तसेच ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, आज दरमहा 1500 रुपये या योजनेत दिले जाते, भविष्यात यात वाढ होणार आहे, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले.
पुढे ते म्हणाले, उद्योगांमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण देण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये महिलांना उद्योगांसाठी 20 टक्के प्लॉट आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानित शाळा, आश्रम शाळेत महिला बचत गट वस्तुंचा पुरवठा करण्यास सक्षम असून बचत गटांना अनेक कामे सरकारने दिले आहे. तसेच शिवणकाम प्रशिक्षण सुद्धा देणे सुरू असून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश संबंधित गावातच तयार झाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
हा बहिणींचा सन्मान निधी : आमदार किशोर जोरगेवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत जिल्हा अग्रक्रमावर आहे. या योजनेमुळे बहिणी खुश झाल्या असून बहिणींना किमान 100 रुपये रोज मिळावे, म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा व्हावे, अशी आपली मागणी आहे. महिलांच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे बहिणींना हा सन्मान निधी देण्यात येत आहे. ज्या बहिणींच्या अर्जात तांत्रिक कारणामुळे त्रुटी आहेत, त्या त्वरित दूर कराव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.
बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉलची निर्मिती
जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आता तंत्रज्ञान, सोलर, सर्विस सेक्टर, उत्पादनांची मार्केटिंग, पॅकेजिंग या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची गरज आहे. बचत गटाच्या वस्तूंसाठी चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर उत्कृष्ट मॉल तयार होत आहे. यात फूड कोर्ट, प्रदर्शनी सेंटर, प्रशिक्षण सभागृह आदी सुसज्ज राहणार आहे. तालुका स्तरावरही बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी असे मॉल उभे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. रिलायन्स पेक्षाही आपला मॉल उत्कृष्ट राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
वन विभागात आता ‘वनसखी
चंद्रपूर जिल्ह्यात कृषी सखी, वॉर्ड सखी सुरू करण्यात आली असून ‘सखी’ या शब्दातच प्रेम जाणवते. वनविभागात सुद्धा ‘वनसखी’ करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आहे.
विविध लाभार्थ्यांचा सत्कार व धनादेश वाटप
यावेळी माविमच्या माधुरी वाकडे, वैशाली गोवर्धन, देवीनंदा भोयर, कीर्ती चंदनमलाधार, नसरीत बानो मोहम्मद हारून, संध्या घरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कल्याणी रायपुरे आणि प्रियतमा खातखेडे यांना 1500 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. लखपती दीदी अंतर्गत लीना मॅडावार, अर्चना टेकाम, लता खोब्रागडे, उज्वला गेडाम यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दाताळा येथील सरस्वती समूह आणि जामतुकूम येथील संतोषी उत्पादक गट यांना धनादेश वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेले प्रियंका मोटघरे, अक्षता रामटेके, चांदणी शेंडे, अस्मिता आत्राम, सुश्मिता गिठणलवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महिलांना पैठणी आणि सुरक्षा कीट
लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यात आलेल्या पाच महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. यात सुलोचना नैताम, कल्पना शेडमाके, शकुंतला चालखुरे, गीता कार्लेकर, अन्नपूर्णा राऊत यांचा समावेश होता. तसेच लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या शीतल दरेकर, माधुरी टेकाम, मोहिता बोंडे, सविता नेवारे, सुनिता किसनाशिले यांना सुरक्षा किट तर विजया गोटमुखले, वासंती नन्नावरे, विद्या सदनपवार, अंकिता चंद्रा, शुभांगी ढगे यांना लकी ड्रॉ द्वारे अम्माचा टिफिन देण्यात आला.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, महिला शिक्षित तर कुटुंब शिक्षित होते. महिलांमुळेच कुटुंबात आर्थिक साक्षरता निर्माण होते. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 4 लक्ष 73 हजार 70 अर्ज प्राप्त झाले, यापैकी 4 लक्ष 64 हजार 800 महिलांना लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांनी या योजनेकरिता अर्ज करावे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची महत्त्वाची पायरी आहे. जिल्ह्यामध्ये तीन लक्ष महिला, बचत गटांसोबत जुळल्या असून बचत गटांना 292 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोंभुर्णा येथील माविमच्या महिला बचत गटाच्या सरिता मून आणि उमेदच्या शुभांगी गोवर्धने यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी मानले.
०००