ईएसआयसी रूग्णालय, कामगार भवनसाठी जागा निश्चितीचे काम तातडीने करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : ईएसआयसी रूग्णालय व कामगार भवनसाठी जागा निश्चितीचे काम लवकरात लवकर करावे, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, ईएसआयसीचे पुणे विभागाचे प्रमुख पी. सुदर्शनन, उपसंचालक चंद्रशेखर पाटील, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळुंखे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या कामगारांच्या उपचारासाठी सांगली येथे १०० खाटांचे रूग्णालय सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ५ एकर जागेची आवश्यकता आहे. सदर जागा निश्चित करताना एमआयडीसी व शहर यांना जवळची असावी. संबंधित सर्व यंत्रणांनी उपलब्ध शासकीय जागांचे पर्याय प्रत्यक्ष भेट देऊन तपासावेत. या रूग्णालयात राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या कामगारांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, असे ते म्हणाले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन बांधण्याच्या पार्श्वभूमिवर सांगलीच्या कामगार भवनसाठी जवळपास एक एकर पेक्षा जास्त जागा आवश्यक आहे. या इमारतीत कामगार कल्याण, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, सुरक्षा रक्षक कार्यालय, सांगली जिल्हा माथाडी कामगार कार्यालय अशा कामगारांशी संबंधित सर्व कार्यालये असतील. त्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धीचे पर्याय प्रत्यक्ष भेट देऊन तपासावेत व जागा मागणीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000