उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणीला गती द्यावी – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 14 : उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रासाठी वाटोळे, (ता.पाटण, जि. सातारा) येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र उभारण्यासाठी जमीन ताब्यात घेऊन प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करण्यात यावी. उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले तसेच प्रशिक्षण केंद्र अंतर्गत प्राधान्याने पुरूष व स्त्री वसतिगृह, ग्रंथालय व मुख्य इमारत प्रधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

मंत्रालयात प्रशिक्षण केंद्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक प्रसार सुर्वे, कोल्हापूर विभागाचे उपायुक्त श्री. चिंचाळकर, उपसचिव रविंद्र औटी, अवर सचिव संदीप ढाकणे आदी  उपस्थित होते.

वाटोळे येथील जागा ताब्यात घेवून बांधकामासाठी आवश्यक परवानग्या काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने जमिनीचा ताबा उत्पादन शुल्क विभागाला द्यावा. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा तसेच हेलिपॅड आदी सुविधांचा समावेश असणार आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राधान्यक्रमानुसार बांधकामे करण्यात यावी. क्रीडा विषयक सुविधांचीही उभारणी करण्यात यावी.

यावेळी उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल पदक व सन्मानचिन्ह प्रदान करण्याच्या योजनेचाही आढावा घेण्यात आला. पदक निवडीबाबत अटी, निवड समित्या, पदकांचे प्रकार आदींबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली. बैठकीला वन, सार्वजनिक बांधकाम, महसूल व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ