उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सृजन ट्रस्टला ३० लाख रुपयांचा धनादेश! – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबई, दि. ९ : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सृजन ट्रस्टला ३० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

            सृजन संस्था डिपेक्स या कार्यक्रमाचे आयोजन करते. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजशीलतेला मंच मिळतो. सृजनशीलतेला वाव मिळतो आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. डिपेक्ससारखे विविध उपक्रम मोठ्यास्तरावर आयोजित व्हावेत, नवीन संकल्पनांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने सृजन संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी  उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, “आत्मनिर्भर भारतासाठी तरुण आत्मनिर्भर झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक आत्मविश्वास तरुणांना डिपेक्ससारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळतो. आज त्यांच्या अविष्कारांना प्रोत्साहन देणारा मंच उपलब्ध आहे, त्यांच्या जिद्दीला वाव देणारी स्पर्धा आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा विकास घडतो, त्यांना मार्गदर्शन मिळते आणि पुढे वाटचाल करण्याची दिशा मिळते. योग्य दिशेने वाटचाल करणारे महत्वाकांक्षी युवक हीच आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. सृजन संस्थेमार्फत विविध उपक्रम आयोजित व्हावेत, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि नवीन संधींचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. “

            २०२४ मध्ये डिपेक्स कार्यक्रमाच्या आयोजनाला ३३ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान इत्यादी शाखांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन भरते. तसेच त्यांच्यात स्पर्धा देखील भरवली जाते. यावर्षी शासकीय औद्योगिक संस्थांचा या कार्यक्रमातील सहभाग उल्लेखनीय ठरला. धनादेश स्वीकार करताना सृजन ट्रस्टचे संकल्प फळदेसाई, अमित ढोमसे, निधी गाला, गिरीश पाळधे व प्राची सिंग हे सदस्य उपस्थित होते.

****

संध्या गरवारे/विसंअ/