उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २२ : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातली शहरे, गावखेडी, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुणवंत खेळाडूंना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात येत आहे. खेळ आणि खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्यात पोषक वातावरण आहे. राज्यातील खेळाडू, क्रीडा संघटना आणि राज्य शासनाच्या सामुहिक प्रयत्नातून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदके जिंकून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, खेळ हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त बनवतात. खेळांमुळे खिलाडू वृत्तीने वागण्याची शिकवण मिळते. सुसंस्कृत, समंजस, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्याने महाराष्ट्रात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्य शासनाबरोबरच क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील या सर्व खेळाडूंचे, क्रीडा संघटनांचे, क्रीडा कार्यकर्त्यांचे आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे मी आभार मानतो.

महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी, राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाबरोबरच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने विविध योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाच्या संघटनांना महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने राज्य क्रीडा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील क्रीडा गुणवत्ता अधिक प्रगल्भ होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षित प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकूल येथील ऑलिम्पिक भवन व ऑलिम्पिक म्यूझियमच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. याठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक म्युझियम विकसित होत आहे. ऑलिम्पिक भवनच्या ७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहे. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

वर्ष २०२८ मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, योगा यासारख्या महाराष्ट्रातील, तसेच भारतातील स्थानिक खेळांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने ऑलिम्पिक समितीकडे पाठपुरावा सुरु आहे.

०००