उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांगवी येथील आरोग्य कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

बारामती, दि.४:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवी येथील कर्मचारी निवासस्थानाकरीता मंजूर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पुणे मंडळाचे कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नव्याने करण्यात येणाऱ्या निवासस्थान इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ पद्धतीचे करावे. त्याकरीता उत्तमप्रतीचे साहित्य वापरावे. या इमारतीमुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार असून अप्रत्यक्षपणे येथील रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना देखील याचा लाभ होणार आहे. एकूणच सांगवीच्या वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहील असे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, बारामती तालुक्यात नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळण्याकरीता पुढील ५० वर्षाचा विचार करुन इमारती बांधण्यात येत आहेत. याकरीता निधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यापूर्वी देखील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, बारामती बसस्थानक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अशा प्रशस्त, सुंदर, भव्य, सोईयुक्त, आकर्षक आणि दर्जेदार इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन लोकार्पण करण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शेती, उद्योग, रोजगार शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याकरीता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

इमारतीसाठी साडे तीन कोटीचा निधी
सांगवी येथील एकूण १२ निवासस्थानाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ३ कोटी ६५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
एका निवासस्थानाचे क्षेत्रफळ ७८४ चौरस फुट असून प्रमाणे एकूण १२ निवासस्थानाचे बांधकाम क्षेत्रफळ ९ हजार ४०८ चौरस फुट आहे.