उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

“शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान यांचे आज निधन झाले. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे जन्मलेल्या उस्ताद रशीद खान यांनी आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स केला. रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक असणाऱ्या खान यांनी चित्रपटांमध्येही त्यांचा आवाज दिला. उस्ताद अमीर खान आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. उस्ताद रशीद खान यांनी ‘राझ 3’, ‘कादंबरी’, ‘शादी में जरूर आना’, ‘मंटो’ ते ‘मीत मास’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाची जादू रसिकांपर्यंत पोहोचवली. संगीत जगताला मंत्रमुग्ध करणारे उस्ताद रशीद खान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते”, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/