कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.१२ (जिमाका) : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला.

सज्ञान झालात.. पण सुजाण झालात का.., वेड मतदान करण्याचे.., 20 मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश देणारे फलक हातात घेवून मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

अठरावं वरीस मोक्याचं.. असा संदेश देत नवमतदारांनाही मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. वसंत व्हॅली, खडकपाडा सर्कल, साई चौकपर्यत सदर रॅली काढण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

138 कल्याण मतदार संघातील स्वीप नोडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅली काढण्यात आली. 20 मे रोजी नक्की मतदान करा.. अशा घोषणा देत या रॅलीत कल्याण मोमीस समूहाचे सदस्य देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

०००