कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना व दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित विभागांना दिले. निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवून तो दररोज पाठविण्याबाबत पोलीस उपायुक्त यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

मुंबई शहर जिल्ह्याच्या बहुतांश सीमा या सागराशी संलग्न असल्यामुळे सागरी सीमा सुरक्षेशी संबंधित कोस्ट गार्ड मेरीटाइम बोर्ड आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश श्री. यादव यांनी संबंधितांना दिले. अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण व त्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई शहर जिल्ह्याला लागून असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST), स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST) यांच्याशी परस्परांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजुसिंग पवार ,मुंबई शहर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री श्यामसुंदर सुरवसे, मेरीटाईम बोर्ड उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली भोसले आदी उपस्थित होते.

0000