केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियंत्रण कक्षाला भेट

धुळे, दि. १९ (जिमाका ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सामान्य) पूर्ण चंद्र किशन, निवडणूक पोलिस निरीक्षक किशन सहाय्य, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष नियत्रंण कक्षाला भेट देवून कामकाजाबाबत आढावा घेतला.

????????????????????????????????????

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी रविंद्र खोंडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, आदी उपस्थित होते.

02-धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवार, 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे वेबकास्टिंगच्या माध्यमामातून मतदार संघातील 986 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. मतदान केंद्रावर कुठलीही समस्या, अडचण निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना नियंत्रण कक्षातून देण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सामान्य) पूर्ण चंद्र किशन यांनी स्वत: या वेबकास्टिंग यंत्रणेचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांनी मतदान प्रक्रियेची माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून घेतली. तसेच सोमवार, 20 मे, 2024 रोजी मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी कंट्रोल रुम मध्ये नियुक्त पथक प्रमुखांनी सतर्क रहावे, तसेच आयोगास पाठवावयाचे अहवाल वेळेत पाठविण्याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध अहवाल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून संकलीत करुन सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. यावेळी त्यांनी जीपीस ट्रॅकिंग प्रणाली तसेच काही मतदान केंद्रांवर सध्या सुरु असलेल्या कामकाजाची वेबकॉस्टिंग प्रणालीद्वारे स्वत: माहिती घेतली.

धुळे लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षाबाबत जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी माहिती दिली. तसेच याठिकाणी मतदानाच्या दिवसाचे अहवाल, ईव्हीएमबाबतचे अहवाल, कंट्रोल रुम, मिडीया कंट्रोल रुम, मतदार समस्या निवारण कक्ष (1950 टोल फ्री), आचारसंहिता कक्ष, वेब कास्टिंग, जीपीएस मॉनिटरिंग कंट्रोल रुम, सायबर सेल, तक्रार हाताळण्याची व्यवस्था (सी व्हीजील कक्ष) आदि तैनात ठेवण्यात आल्याबाबत तीनही निवडणूक निरिक्षकांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

पोलीस अधिक्षक कार्यालयातील कंट्रोल रुमलाही भेट

यानंतर केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात असलेल्या कंट्रोल रुमलाही भेट देवून तेथील डायल 112, कंट्रोल रुम, सीसीटीव्ही रुमच्या कामकाजाची पध्दती समजून घेतली. यावेळी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेली तयारी, पोलीस बंदोबस्त आदिंची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी निरिक्षकांना दिली.  पोलीस दलाने केलेल्या नियोजनाबाबत निरिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

०००