केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून मुख्य कार्यक्रमस्थळाची पाहणी

नाशिक, दि. १० (जिमाका) :नाशिक येथील तपोवन मैदानावर होणाऱ्या २७  व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्य कार्यक्रम स्थळाची पाहणी करून अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

या महोत्सवासाठी परराज्यातून येणाऱ्या युवकांची निवास व भोजन व्यवस्थेत कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या कार्यक्रमस्थळी येतांना वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन करावे. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात यावी. राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना ही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००