खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट            

सिंधुदुर्गनगरी दि 02 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जिल्हा माहिती कार्यालयात कार्यन्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्षास ४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, अमित मेश्राम, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी महेंद्र किणी आदी उपस्थित होते.

यावेळी माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव मुकुंद चिलवंत यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. या समिती मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जाते. सोशल माध्यमांवर छुपा प्रचार सुरू तर नाही ना याची देखील पाहणी केल्या जाते. छुप्या पद्धतीने, परवानगी न घेता पेड न्यूजच्या माध्यमाने उमेदवारांनी प्रचार सुरू केला असल्यास एमसीएमसी समिती झालेला सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याच्या खर्च विभागामार्फत दाखल केल्या जात असल्याचेही श्री चिलवंत यांनी सांगितले. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी समाधान व्यक्त केले.