गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

गडचिरोली, दि. १७ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आजपासून सुरूवात करण्यात आली. 69-अहेरी मतदारसंघात 76 निवडणूक पथकातील 304 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या एम.आय.-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने 14 बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

b1665b72 802d 4f19 98f8 e1010a3e972c गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

यावेळी निवडणूक विभागाद्वारे मतदान पथकातील अधिकाऱ्यांचे बँडबाजा, पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार संघातील 972 मतदान केंद्रापैकी 211 मतदान केंद्रावर 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व मतदान साहित्य पोहचविण्यात येणार आहे. अहेरीत आज 76, उद्या 25 व 19 नोव्हेंबर रोजी 44 पथकांना एअर लिफ्ट करण्यात येत असून गडचिरोली मतदारसंघात 18 नोव्हेंबर रोजी 13 पथके तर आरमोरी मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी 39 पथके व 19 नोव्हेंबर रोजी 14 पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात येत आहे.

26d5fdef 4f93 4b14 8924 bd54977267fa गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

०००

 

The post गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना first appeared on महासंवाद.