गरजूंना घरकुल मिळण्यासाठी अतिक्रमणे नियमानुकूलची कार्यवाही गतीने पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. १४ : सर्वांसाठी घरे या धोरणातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील भूमिहीन लाभार्थ्यांची गावठाण, गायरान, शासकीय, पुनर्वसन व अन्य जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करुन गरजूंना घरकुल उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृती दलाची बैठक डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपायुक्त संजय पवार, श्री. फडके, श्री. जोशी, कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजनेंतर्गत घरकुलांची अपूर्ण कामे गतीने पूर्ण करण्यात यावी. सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना, दलित वस्ती सुधार योजना व आदिवासी विकास विभागाची शबरी, पारधी, आदिम जमाती योजनेंतर्गत घरकुलाची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने याबाबतचा सविस्तर आढावा घ्यावा. अपूर्ण घरकुल लवकर पूर्ण होण्याच्यादृष्टीने कार्यान्वयन यंत्रणांसोबत बैठक घेऊन घरकुलांचे लक्ष्यांक पूर्ण होण्याच्या दृष्टीने समन्वय व प्रभावी नियोजन करावे. आवास योजनेसंदर्भात संपूर्ण समन्वय व देखरेखीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.

लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अगोदर विभागातील सर्व प्रलंबित घरकुलांची कामे पूर्णत्वास जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. निधी खर्चाच्या बाबी संदर्भात प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यतेच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता प्राप्त करुन घ्यावी. विभागांतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

विकास उपायुक्त श्री. फडके यांनी अमरावती विभागातील अपूर्ण व पूर्ण घरकुलांच्या सद्यस्थिती व अनुषंगिक बाबी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. तर उपायुक्त श्री.जोशी यांनी विभागातील आस्थापना विषयक बाबींसंबंधी सादरीकरणातून माहिती दिली.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, स्वच्छ भारत मिशन, ग्राम बालविकास केंद्र, कर वसुली अहवाल, 15 व्या वित्त आयोग मासिक प्रगती अहवाल, माझी वसुंधरा योजना, मुलभूत सुविधा, ग्रामीण रस्ते व इतर योजना, सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे, अनुकंपा पदांची सद्यस्थिती आदीबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीत घेतला.

०००