गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 115-मालेगाव बाह्य मतदारसंघात आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी एकूण 21 मतदारांनी घरुन आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघ निवडणूकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदार संघात पंधरा (15) 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर सहा (6) दिव्यांग असे एकूण 21 मतदारांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 115-मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात आज (12 मे) रोजी गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी संपूर्ण मतदार संघासाठी 2 टीमची नियुक्ती केली होती. प्रत्येक टीममध्ये चार अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून या टीमने मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघात गृह मतदानासाठी 432 ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी विधानसभा मतदार संघनिहाय पहिल्या फेरीत आजपर्यंत झालेले गृह मतदान धुळे शहर (49), धुळे ग्रामीण (86), शिंदखेडा (105), बागलाण (98) मालेगाव मध्य (24), मालेगाव बाह्य (21) असे एकूण 383 मतदान नोंदविण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गृह मतदार दुसऱ्या फेरीत घेण्यात येणार आहे.

०००