मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
बहिणींच्या खात्यात निधी वितरणाचा शुभारंभ
जिल्ह्यात 4 लाख 60 हजार खात्यात रक्कम जमा
प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश
यवतमाळ, दि. १७ (जिमाका) : गेल्या काही दिवसात महिलांच्या कल्याणासाठी शासनाने नवनवीन योजना सुरु केल्या. त्यातील लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच समाजात, कुटुंबात चांगले स्थान निर्माण करून दिले जात आहे. अशा चांगल्या कामाद्वारे बहिणींची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथून झाला. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री मदन येरावार, डॅा.संदीप धुर्वे, इंद्रनील नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शाम जयस्वाल, माजी सभापती श्रीधर मोहोड आदी उपस्थित होते.
कमी कालावधीत जिल्ह्यात योजनेचे अतिशय उत्तम काम झाले. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच आज 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली. आपण जिल्ह्यात 7 लाख पात्र महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या आकडा आपल्याला गाठायचा आहे. एकही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.
महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी अन्नपुर्णा योजना सुरु करण्यात आली. बचतगटाच्या महिलांना फिरते भांडवल अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. गटाच्या ग्रामसंघांना 1 कोटी रुपये खर्चाचे कार्यालय, गोदाम बांधून देण्याचा कार्यक्रम आपण राबवतो आहे. युवक, वयोवृद्ध, शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना शासनाने सुरु केल्या असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले. आभार महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी मानले.
यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुमन ताळीकोटे, गंगा ताळीकोटे, हर्षा पप्पुवाले, मंजूषा दुधे, नेहा अमरीन फय्याज अहमद, नुसरतजहॅा अब्दुल लतीफ, अश्विनी डंबे, माणिक तांबेकर, ममता पाईकराव, श्रृती भगत, नंदा सुतारकर या महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे, पर्यवेक्षिका मनिषा पवार, अंगणवाडी सेविका सुलभा सिंगारकर, धनश्री ठाकरे, तिलोतमा बेले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
०००