‘चांदा ते बांदा’ योजनेला मिळणार गती

मुंबई, दि. 15 : चांदा ते बांदा योजनेंतर्गत सर्व कामे गतीने करावीत. पर्यटन विभागाचा  या योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले.

चांदा ते बांदा योजनेंतर्गत मंत्रालयात आयोजित बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभाच्या सचिव शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, शालेय शिक्षण विभाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सिंधुदुर्ग  जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यात असलेले प्रत्येक पर्यटन स्थळ विकसित झाले, तर येथील पर्यटनाला सर्वाधिक वाव मिळेल. स्थानिक ठिकाणी विकासाला चालना मिळून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चांगल्या सुविधा मिळावे त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतील सर्व कामे गतीने करावी. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या भागातील पर्यटनाचा विकास करावा.

चांदा ते बांदा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शिल्प ग्राम, हेल्थ पार्क भोसले उद्यान व रघुनाथ मार्केट, स्पाइस व्हिलेज(वेंगुर्ला), दिशादर्शक फलक ही कामे पूर्ण आहेत. या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या योजनेतील उर्वरित सर्व कामे पुढील एक वर्षात पूर्ण करायची आहेत.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी 25 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित कामांमध्ये रेल-ओ- टेल (सावंतवाडी रोड), महाराष्ट्र गोवा सीमेवरील सुशोभीकरण. (बांदा), आंबोली येथील साहसी क्रीडा प्रकार, जंगल सफारी, फुलपाखरू उद्यान ही कामे, नवाबाग फिशिंग व्हिलेज (वेंगुर्ला), नरेंद्र डोंगर (सावंतवाडी), यशवंत गड (दोडामार्ग), भरतगड किल्ला (मसुरे, मालवण), नापणे (वैभववाडी) व सावडाव धबधबा (कणकवली), कर्ली खाडी (तारकर्ली, मालवण), तिल्लारी धरण (दोडामार्ग), आरोंदा खाडी (शिरोडा), निवती -(वेंगुर्ला), मोनोरेल (सावंतवाडी भोसले उद्यान) या चांदा ते बांधा योजनेतील पर्यटन विभागाशी संबंधित कामासाठी उपलब्ध निधी मार्च 2025 पर्यंत खर्च करण्यासाठी मान्यता मिळावी, अशी सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली.

0000

संध्या गरवारे/विसंअ/