चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट

मुंबई, दि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यात नंदुरबार मतदारसंघामधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, मावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, पुणेमधील 2018 मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

राज्यातील चौथ्या टप्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारांनी मतदान करावे यासंदर्भात जागृतीही करण्यात येत असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

 

पवन राठोड/ससं