‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’चे आयोजन नेटकेपणाने करण्याच्या मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचना

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण स्तरावर पारंपरिक खेळ खेळले जायचे ते आज लुप्त होत चालले आहेत. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, जिल्हाधिकारी, मुंबई व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग तसेच क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव”चे आयोजन करण्यात येत आहे. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केल्या.

यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी विविध खेळप्रकाराच्या मुंबई उपनगर व मुंबई शहर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव” हा मुंबई उपनगरात अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून त्यात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उड्या, रस्सीखेच, फगदी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर सौष्ठव, ढोलताशा या 16 पारंपरीक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात घेण्यात येणार आहेत.आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर सौष्ठव व ढोलताशा हे चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, तालुकास्तर मल्लखांब, कबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिम सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर 9 खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा 6 ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 20 मैदान/सभागृहात ही स्पर्धा होईल. त्यातील अंतिम स्पर्धा ह्या 10 मैदान आणि सभागृहात होणार आहेत. या  स्पर्धेत तालुका स्तरावर सांघिक खेळांमध्ये प्रथम येणाऱ्या 4 विजयी उपविजयी संघाच्या खेळाडूंना वैयक्तिक चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन तसेच वैयक्तिक खेळांमध्ये प्रथम येणाऱ्या 4 विजयी, उपविजयी खेळाडूंना वैयक्तिक चषक, पदक व प्रमाणपत्र व रोख बक्षीसांनी गौरविण्यात येणार आहेत.

या स्पर्धा विविध खेळप्रकाराच्या मुंबई उपनगर व मुंबई शहर येथील विविध संघटनांमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. संघटनेच्या पंचांना मानधन देण्यात येणार आहे तसेच खेळाडूंना काही दुखापत झाल्यास आपत्कालिन निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उ‌द्घाटन दि. 26 जानेवारी 2024 रोजी शिवसृष्टी मैदान, कुर्ला पूर्व येथे होणार आहे तसेच या क्रिडा महोत्सवाचा समारोप जांभोरी मैदान, वरळी, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

***************