जनजागृतीसाठी असलेल्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई, दि. ६ : जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. यानुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४.११.२०२३ रोजीच्या पत्रातील निर्देशांनुसार राज्यात दि.१०.१२.२०२३ ते दि.२८.०२.२०२४ या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्हयातील एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो.

पुणे जिल्हयातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरीता उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे मुख्यालय सासवड येथे आहे. तेथील तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरुममध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमासाठी वापरावयाच्या ४० ईव्हीएम (४० Ballot Unit, ४० Control Unit, ४० व्हीव्हीपॅट) ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरुमकरीता सासवड पोलिस स्टेशनकडून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, पुणे तसेच पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडून प्राप्त अहवालानुसार या ईव्हीएमपैकी एक Control Unit चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. यानुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये दि.५.२.२०२४ रोजी तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील चौकशी करण्यात येत आहे, असेही म्हटले आहे.

०००००