जल जीवन योजनेमधील कामांना अधिक गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २० :- ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात जल जीवन मिशन योजना महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे या योजनेतील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या कामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २.० चा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे कार्यकारी संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेतल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेतील कामे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहेत. योजनेतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तसेच योजनेतील ज्या कामांचे कार्यादेश प्रलंबित आहेत त्यांची पूर्तता करून करून ते तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ चा आढावा घेताना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२४-२५ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त अधिक (ODF+) मॉडेल बनवणे हा मुख्य उद्देश आहे. स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम  यासह विविध कामे तातडीने पूर्ण करावीत व यादृष्टीने कार्यवाही केली जावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ