जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव,दि.१२ (जिमाका ):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान साहित्य , ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. १२ रोजी करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले. आज सोमवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात ३८८६ मतदान केंद्र

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदारसंघ मिळून ३८८६ मतदार केंद्र आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९८२ मतदार केंद्र आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात १९०४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात एकूण २१ दिव्यांग मतदार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर ३३ महिला मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. जिल्हयात एकूण ११ युवा मतदान केंद्र तर ५५ आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

१७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान ड्युटी करीता १७ हजार ८२१ पुरुष व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात  मतदान केन्द्राध्यक्ष पुरुष ४२६७, मतदान केन्द्राध्यक्ष महिला ४६ असे एकूण ४३१३ , प्रथम मतदान  अधिकारी पुरुष ४२६७ प्रथम मतदान  अधिकारी महिला ४६ असे एकूण ४३१४ , इतर मतदान अधिकारी पुरुष ४२३४ , इतर मतदान अधिकारी महिला ७९ असे एकूण ४३१३ ओ पी ओ २ पुरुष ३७५ महिला ४५६१ असे एकूण ४९३६ तर राखीव २२७७ असे एकूण १७ हजार ८२१ कर्मचारी मतदान ड्युटी करीता नियुक्त करण्यात आले आहेत.

१५९३ वाहनांची सोय

मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती. सोय करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ३९२ एस टी बसेस ,मिनी बस १२,जीप २३,टेम्पो १४ सीटर ८,टेम्पो २० सीटर ११, क्रुझर ४७५,स्कूल बस ७०, एस ओ जीप ४१६,ईव्हीएम वाहतूक वाहन ६६,आचार संहिता उल्लंघन कक्ष वाहने ६६,राखीव वाहने ६६ असे एकूण १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती.

३८८६ मतदान यंत्रे रवाना

मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३८८६ मतदान केंद्रावर रविवारी ३८८६ मतदान यंत्रे व व्ही व्ही पॅट मशीन सह वाहनांच्या सहाय्याने  निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले . त्यासोबतच कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करण्यासाठी राखीव मतदान यंत्रे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६ मतदार

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर असे दोन्ही मतदार संघ मिळून जिल्ह्यात ३८ लक्ष १५ हजार ७९६  मतदार आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात १९ लक्ष ९४ हजार ४६ इतके मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यात १ लक्ष ३७ हजार ३५० पुरुष मतदार तर ९ लक्ष ५६ हजार ६११ महिला मतदार व ८५ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात १८ लक्ष २१ हजार ७५० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ९ लक्ष ४१ हजार ७३२ पुरुष मतदार तर ८ लक्ष ७९ हजार ९६४ महिला मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर ५४ तृतीयपंथी मतदार नोंदविण्यात आले आहेत.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात ०१ पोलीस अधीक्षक ,०२ अप्पर पोलीस अधीक्षक,०९ पोलीस उपधीक्षक,३१ पोलीस निरीक्षक,११९ सहाय्य्क /उपनिरीक्षक ,जिल्ह्यातील अंमलदार २५५०, बाहेरील जिल्ह्यातील अंमलदार २३६०,बीएसएफ ०१ कंपनी ,०२ एसआरपीएफ प्लाटून,०२ सीआरपीएफ प्लाटून ,३०८५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या शिवाय बाहेरील राज्यातील तीन पोलीस कंपनी देखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यात केरळ येथील २ कंपनी तर कर्नाटक येथील १ कंपनी दाखल झाली आहे.

मतदान केंद्रावर मोबाईल बंदी

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर मोबाईल फोन,स्मार्ट वॉच ,कार्डलेस फोन, वायरलेस सेट सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास , बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र

जिल्ह्यात उभारण्यात आलेले ३८८६ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड , मतदार सहाय्य्यता केंद्र, आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता आज दि. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी  न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भय पणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभावी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जळगाव , रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह अधिकारी ,कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना.

०००