जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करूया! – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे  

परभणी, दि. 01 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये विकासात मोठी भरारी घेत उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. या प्रगतीमध्ये जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र स्थापना दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आज प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर पार पडला.  त्यानिमित्त आयोजित  कार्यक्रमात  जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, श्रीमती संगीता चव्हाण, जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

परभणी जिल्हा प्रशासनाने नुकतीच लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया कायदा सुव्यवस्था राखत शांततेत यशस्वीरित्या पार पाडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी चांगले काम केले. इतर मतदार संघाच्या तुलनेत आपल्या मतदार संघातील मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याने 62.26 टक्के मतदान झाले असे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले.

गतवर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करुन आवश्यक त्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र जूनपर्यंत पुरेल एवढा चारा व पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्हा प्रशासन दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असून, पावसाळा येईलपर्यंत पुरतील अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 450 हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या शेती पिकांचे पंचनामे प्रक्रिया सुरु आहेत. तसेच वीज पडून 2 नागरिक, तर 29 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 1 व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला असून त्यांना मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे. त्यासाठी  राज्याच्या विकासासाठी राबणाऱ्या त्या हातोचही अभिनंदन करुन त्यांनाही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्याचा 64 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी-कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी, आणि पत्रकारांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना त्यांनी सर्वप्रथम अभिवादन केले. महाराष्ट्र राज्यासह आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगतीसाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले.

मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी आयोजित रिल्स स्पर्धा, गुढी मतदानाची या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी  जिल्ह्यातील पोलीस पथकाच्या विविध परेड कमांडर यांनी पथसंचलन करत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना मानवंदना दिली.