जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध; गत दोन वर्षांत राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले : पालकमंत्री गिरीष महाजन

स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

धुळे, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त): जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संजय बागडे, संदीप पाटील, गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, वैशाली हिंगे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी यांचेसह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, गेल्या 77 वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले, त्याग केला. आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे. अशाप्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरता येणार नाही.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले.

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 लाख 65 हजार लाभार्थी

राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 897 महिलांनी अर्ज केले. यापैकी 2 लाख 65 हजार 297 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. पात्र महिलांना येत्या 17 तारखेला दोन महिन्याचे दरमहा 1500 प्रमाणे 3 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यात 2 हजार 271 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री.महाजन पुढे बोलतांना म्हणाले की, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहायक साधने, उपकरणे खरेदीकरीता वयोश्री योजनेतून प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत प्रती व्यक्ती 30 हजार इतका खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय, कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्र निकेतन, विद्यापीठातील व्यवसायिक, वैद्यकीय अभ्यासक्रमांस प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, नविन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना एप्रिल 2024 पासून 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. तर सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यास मान्यता देण्यात आली आहे.

 पर्यटन विभागाचे एकच घोषवाक्य

पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते. मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे. राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाने नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024’ जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला विविध योजनेचा लाभ

यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत 125 टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली आहे. शेतकरी सुखी आणि समाधानी राहण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यातील 2 लाख 41 हजार 186 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 1 लाख 62 हजार 232 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 165.35 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत 36 शेतकऱ्यांना 70 लाखाचे अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 1 हजार 38 शेतकऱ्यांना 676.70 लाख अनुदान देण्यात आले. कृषि औजारांसाठी 241.30 लाख रक्कम देण्यात आली. साक्री तालुक्यात पशु चिकित्सालयाच्या इमारतीसाठी 466 लक्ष निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून सहा मोठे पशु प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहे. गोशाळा अनुदान योजनेत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील दोन गोशाळांना अनुदान वितरीत केले आहे.

महसुल पंधरवड्याचे आयेाजन

राज्यात महसूल व वनविभागामार्फत 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात प्रत्येक दिवशी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती, पाऊस आणि दाखले, युवा संवाद, महसूल-जनसंवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मागर्दर्शन असे 581 शिबिर घेण्यात आले. यात 17 हजार 555 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेत अनुसूचित जमातीच्या 300 महिला बचतगटांना प्रति बचतगट 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. एकात्मिक कुकुटपालन व्यवसाय अर्थसहाय्य योजनेत आदिवासी महिला बचत गटांना 78 लाख 75 हजार रक्कम देण्यात आली आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत 1 हजार 120 कामांना मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 59 हजार 451 घरकुले, राज्यस्तरीय शबरी आवास योजनेतंर्गत 9 हजार 173 घरकुले, राज्यस्तरीय रमाई आवास योजनेंतर्गत 7 हजार 104 घरकुले पूर्ण करण्यात आली. मोदी आवास योजनेत जिल्ह्यास 9 हजार 709 घरकुलाचे उद्दिष्ट असून सर्व घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अतंर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द असून धुळे जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतून नवीन व सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या एकूण 357.51 कोटी किमतीच्या 451 योजना हाती घेण्यात आल्या असून आजअखेर 127 योजना पूर्ण झाल्या असून जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 716 ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 673 गावापैकी 194 गावे हर घर जल घोषीत झाली आहे.  जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2024-2025 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण 469 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यांचा झाला सन्मान

भारतीय स्वातंत्र्याचा 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत श्रीमती भावना आकाश पाटील, कु. दिशा सोनवणे, श्रीमती वैष्णवी विलास मराठे, श्री. हिम्मतसिंग देवीसिंग गिरासे, श्री. सिध्दांत महेंद्र महिरराव यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

मतदार जनजागृती व नावनोंदणीबाबत प्रचार प्रसाराचा उल्लेखनीय कामगिरीबाबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिनेश सैंदाणे व सुभाष कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आला. सन 2023-24 मध्ये उतकृष्ठ कामगिरी बजावल्याने धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 येथील तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, कारागृह शिपाई धनराज चव्हाण, निलेश जाधव  तसेच सन 2020-21 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह शिपाई कैलास चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला.

जिल्हा उद्योग केंद्र, धुळे यांच्यावतीने सन 2022-2023 साठी पात्र उद्योग घटक प्रथम पुरुस्कार मे.यु.के.प्लॅस्टिक, धुळे तर द्वितीय पुरस्कार मे. बाबुजी ॲग्रो इंडस्ट्रिज, शिंदखेडा जि. धुळे या कंपनीला  देण्यात आला. तसेच सन 2023-2024 वर्षांसाठी प्रथम पुरुस्कार मे. वर्धमान पेंटस, एमआयडीसी अवधान. धुळे तसेच द्वितीय पुरस्कार मे. सागर एन्टरप्राईजेस, एमआयडीसी अवधान, धुळे या कंपनीला देण्यात आला.

त्याचप्रमाणे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवायांना परिणामकाररित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस उप निरिक्षक हरिशचंद्र पाटील, संदिप ठाकरे, मिलींद नवगिरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलात उल्लेखनिय व उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलीस उप निरिक्षक देवीदास वाघ, सहायक पोलीस उप निरिक्षक, संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेतंर्गत रघुनाथ पाटील, किरणकुमार पाटील, सुभाष पाटील, देवीदास मिस्तरी, प्रविण पाटील यांचा स्वामित्व योजनेतंर्गत सनद वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धुळे राखीव पोलीस दलाचे परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना दिली. यावेळी तिरंगा शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते नागरीकांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक महिलांनी पालकमंत्री श्री. महाजन यांना राखी बांधली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुनम बेडसे आणि जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते एलईडी मोबाईल व्हॅनचे उद्धटन

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एलईडी मोबाईल व्हॅनचे उद्धटन पालकमंत्री  गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या व्हॅनद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषद क्षेत्रातील 288 ठिकाणी या व्हॅनद्वारे प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना, ग्रामीण महाआवास अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा  खरेदी अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण भागातील पायाभूत विकास, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीथक्षेत्र विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ वारी, सुंदर वारी या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

शिरपूर येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे ई लोकार्पण संपन्न

शिरपूर शहरातील नवीन सीसीटीव्ही यंत्रणेचे ई-लोकार्पण पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाले. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या निर्देशानुसर जिल्हा नियोजन समितीमार्फत शिरपुर शहरात निश्चित केलेल्या 37 संवेदनशिल ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यासाठी 1 कोटी 81 लक्ष 14 हजारच्या रक्कमेस मान्यता देण्यात आली होती. यातून शिरपुर शहरात 37 संवेदनशिल ठिकाणी एकुण 105 फिक्सड बुलेट, 10 पी.टी. झेड कॅमेरे व 18 ए.पी.आर. कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शिरपुर शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी, शाळा / कॉलेज, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठ भागात मुख्य महामार्ग या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.