जिल्ह्यातील विविध गौरवपूर्ण वैविध्याला अधोरेखित करतील प्रातिनिधीक मतदान केंद्र

नागपूर दि.१८ : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी उद्या, दि. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान शांततेत व शिस्तीत पार पडावे यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी या करिता मतदार जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून नागरिकांसाठी मतदानाचा नावीन्यपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी विविध प्रकारचे थिम मतदान बुथ तयार करीत जिल्हा निवडणूक यंत्रणेने लोकशाहीच्या प्रक्रियेत नाविन्यता आणि लोक सहभागाचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.  जिल्हयाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विविधतेचे प्रतिबिंब मतदान केंद्रात साकारण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी महिला, युवा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची निर्मीती करण्यात आलेली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यात एकूण १० मतदान केंद्राचा समावेश असणार आहे.

बांबू थिम मतदान केंद्रः जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कक्ष क्र. १ कट्टा, ता. रामटेक,  वन (Forest) थिम मतदान केंद्रः नागपूर विद्यापीठ, मानवशास्त्र विभाग कक्ष क्र. ८. उत्तर पश्चिम नागपूर, वस्रोद्योग (Textile) थिम मतदान केंद्रः सरस्वती विद्यालय, बूथ क्र. ३१६, पश्चिम नागपूर, आदिवासी प्रेरित पर्यावरणपूरक सहयोगी मतदान केंद्र:- चारगाव, कुवारा भीमसेन, पारशिवनी, सैन्य प्रेरित मतदान केंद्रः मतदान बूथ क्र. ५१, सेंट जोसेफ हिंदी प्राथमिक शाळा कक्ष क्र. ३, कामठी, तृतियपंथीयांसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले इंद्रधनुष थिम मतदान केंद्रः- दादा रामचंद्र बाखरू सिंधु महाविद्यालय पाचपवली कक्ष क्र. १, नागपूर (नवीन मंगलवारी),  कृषी थिम मतदान केंद्रः मतदान बूथ क्र. २६६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोधनी, ता. उमरेड, क्रीडा थिम मतदान केंद्रः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल, नागपूर, पर्यावरण थिम मतदान केंद्रः- गोकुल बालवाडी बूथ क्र. १६२, नागपूर पश्चिम, मेट्रो थिम मतदान केंद्र: हडस हायस्कूल, इन्स्टीटयूट ऑफ इंजिनीयर्स मेट्रो स्टेशन च्या जवळ अशी ही दहा नावीन्यपूर्ण मतदान केंद्रे असणार आहेत.

नावीन्यपूर्ण थिम मतदान केंद्रांमुळे मतदान प्रक्रियेच्या अनुभवाला उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात नागपूरच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विविधतेचे चित्रण करण्यात आलेले आहे. यासाठी विविध शासकीय विभाग आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेचा मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याचा प्रयत्न आहे.  या विविध थिमबेस मतदान केंद्रांमुळे निवडणुकीची प्रक्रिया सुलभ आणि उत्तम करण्यावर भर देण्यात आलेला आहे. यामुळे मतदारांना उत्कृष्ट अनुभवासह मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

*****