शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम जिल्हा वार्षिक आराखडया पेक्षाही अधिक
हुतात्मा स्मारकास मानवंदनासह मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मुख्य ध्वजारोहण समारंभ साजरा
बीड, दि. 17 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घसघशीत लाभ देण्यात आलेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम जिल्हा वार्षिक आराखड्यापेक्षाही अधिक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी केले.
येथील पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी श्री मुंडे बोलत होते. यावेळी अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पीता ठुबे, स्वातंत्र्यसैनिक, समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर समाजसेवक आणि बीडकर जनता मोठ्या संख्येने आजच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित होती.
तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे स्मारकास 21 तोफांची सलामी देण्यात आली. कृषिमंत्री श्री मुंडे यांनी या ठिकाणी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिनिधी म्हणुन कारभारी शिवाजीराव सानप, अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले.
आपल्या भाषणात श्री. मुंडे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाची सांगता आज होत असल्याचे सांगून या संग्रामात आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्यांना श्रध्दांजली अर्पित केली. तसेच उपस्थितांना मुक्ति संग्राम दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. मागील वर्षभरात मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्याने पोहोचण्यासाठी मागील वर्षभरात बरेच कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे सांगीतले.
यावर्षी चांगला पाऊस आला मात्र, कुठे अधिक पावसाने शेतीचे नुकसानही झाले असून स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल असल्याचे सांगुन नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती मदत करण्यासाठी शासन पावले उचलत असल्याचे सांगितले.
केंद्राचे आभार
ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाने सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच कांदा निर्यात बंदी देखील उठवली असून आयात होणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविले याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई विमा योजनेतून व्हावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात 420 कोटींहून अधिक रक्कम यात देण्यात आली असून यंदाच्या हंगामात झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 25 % टक्के अग्रीम दिल जाईल, असे आश्वासन श्री मुंडे यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत जिल्हयातील साडे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 399 कोटी रूपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या सोबतच 2023 च्या खरिप हंगामासाठी कापूस आणि सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. याचा लाभ जिल्हयातील 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणखी एक निर्णय शासनाने घेतला तो म्हणजे कृषी पपांचे वीज बील माफ करण्याचा निर्णय होय. याचाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले.
राज्याचा कृषीमंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना लाभाच्या सर्व योजनांमधून आर्थिक मदत देण्याची जबाबदारी पार पाडत असून जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालये अद्यायावत व्हावी यासाठी बीडसह आष्टी तसेच शिरूर येथे साधारण 7 कोटी खर्चुन नव्या इमारती आकारास येत आहेत, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत बीड जिल्ह्यातील 6 लाख 18 हजारांहून अधिक भगिनींना दरमहा 1500 रूपये वाटप सुरू झाले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, वयोश्री योजना, आदिंच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना लाभ दिला जात आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या श्रध्दास्थांनाना भेटी देता येणे शक्य होणार आहे. तरूणांच्या हाताला काम देणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जिल्हयात 2 हजार 386 उमेदवारांना नियुक्ती दिली गेली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात 1 हजार 201 योजना दूतांच्या माध्यमातून घराघरात शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून आणखी रोजगार संधी निर्माण होत आहेत. काल ईद आणि आज गणरायाला निरोप देणार आहोत या दोन्ही सणांसह येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छाही श्री मुंडे यांनी याप्रसंगी दिल्या.
76 वर्षांपूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलत आहे. मागासलेला मराठवाडा आणि बीड जिल्हा हे आता इतिहासजमा होऊन प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर करूया असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन अंकुश शेळके यांनी केले.
आज झालेल्या पथ संचलनात पोलीस प्लाटून पुरुष व महिला, होमगार्ड प्लॅाटून पुरुष व महिला यासह बलभीम कॉलेज, के. एस. के. कॉलेज, बंकटस्वामी कॉलेज, बलभीम कॉलेज महिला यांच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2.0 अंतर्गत घरकुलांना मंजुरी, मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रतिकात्मक चावीचे वितरण करण्यात आले.