जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रायगड, दि. २७ (जिमाका): रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले.

रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी.  आवश्यकतेनुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.

वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी.  ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी.आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री.जावळे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात बनवली जाणारी आदर्श मतदान केंद्र सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाची तारीख लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देताना सोबत एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.

 

०००