जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही

शासन आपल्या दारी उपक्रमातील महाराजस्व अभियानांतर्गत १ हजारपेक्षा जास्त आदिवासी लाभार्थ्यांना लाभांचे वितरण

जळगाव,दि.१५ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यात शबरी आवास योजनेत‌ यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले‌ आहे‌. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दीड हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले आहेत. भविष्यातही जिल्ह्यातील एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. गावा –  गावात आदिवासींसाठी दफनभूमी, एकलव्य स्मारक, आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजाला देण्यासाठी शासन कटीबद्ध असून माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे‌. असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते.

 धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे “शासन आपल्या दारी”  उपक्रमातील महाराजस्व अभियानांतर्गत आदिवासी घटकांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ व दाखले वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार, धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ते पंढरीनाथ मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आदिवासी लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन‌ योजनांची अंमलबजावणी करत आहे. असे नमूद करून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ठक्कर बाप्पा योजनेत धरणगाव तालुक्यातील १००% म्हणजे ५०० घरकुल मंजूर करण्यात आली असून  क्रांतीवीर ख्याजा नाईक स्मारकांसाठीच्या सुशोभीकरण व रस्ता कामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील सर्व आदिवासी वस्त्यांत  प्रकाशमान व्हावेत यासाठी या गावांमध्ये लाईट लावण्यात येणार आहेत. आदिवासी समुदायाला प्रत्येक गावात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. जळगाव एरंडोल,

अमळनेर येथे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी नियमितपणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांना योजनेच्या लाभासाठी यावल प्रकल्प कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही . त्यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिला आहे.

बाल विवाह पद्धतीला तिलांजली दया

शासन संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक लाभार्थ्यांना १५०० रूपयांचा लाभ देत आहे. जागा घेण्यासाठी दीनदयाळ‌ उपाध्याय योजनेतून आता ५० हजाराऐवजी  एक लाख रूपयांचा लाभ देण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन‌ कटीबद्ध आहे. अशी ग्वाही ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. आदिवासी समुदायाने बालविवाह प्रथेला तिलांजली दिली पाहिजे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे करीत असलेल्या आदिवासींसाठी राबविलेल्या योजना व वाटप केलेले विविध दाखले यांचे जिल्ह्यात रेकॉर्ड झालेले आहे. त्याबद्दल  पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, महसूल प्रशासनाने जिल्ह्यात वर्षभरात १० हजार ५४० दाखल्यांचे आदिवासी व्यक्तींना वाटप केले आहे. यामुळे शिक्षण,रोजगार व नोकरीच्या संधीचा आदिवासी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. विविध योजनांमधील ४९ हजार मयत लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आला आहेत‌. त्यामुळे योजनांचा लक्षांक वाढला आहे. आदिवासी उपयोजनेत जिल्ह्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. आदिवासी घटकांच्या विविध योजनांसाठी प्रशासनाकडे मुबलक निधी‌ उपलब्ध आहे. यासाठी योजनांचा लाभासाठी अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.  तर आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची जिल्हा प्रशासनाची सकारात्मक मानसिकता असल्याचे मत पंढरीनाथ मोरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

यावेळी महाराजस्व अभियानांतर्गत  पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही आदिवासी लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्र व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय कुटुंब योजनेंतर्गत तालुक्यातील ६७ महिलांना प्रत्येकी २० हजार रूपये असे १३ लाख रूपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. ८५० जणांना आदिवासी जातीचे दाखले वितरित करण्यात आले. १५० जणांना ई- शिधापत्रिका वाटप करण्यात आली. ४८० आदिवासी लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ वाटप करण्यात आला.‌ आदिवासी घरकुलाचा  धरणगाव तालुक्यातील ५०० (शंभर टक्के) लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी लाभार्थ्यांंसाठी आधारकार्ड दुरूस्ती, बॅंक खात्याशी आधारकार्ड लिंकिंग, पीएम किसान योजना, आधार सिडिंग, जीवनज्योती योजनेसह विविध योजनांचा लाभाचे  मार्गदर्शन करण्यासाठी स्टोल लावण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी, आदिवासी बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकाऱ्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्यांच्या माध्यमातून स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना तीळगुळ वाटप करत मकरसंक्रांतीच्या (उत्राण) शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास हनुमंतखेडा गावाचे सरपंच जरूबाई पाटील, आदिवासी टायगर सेनेचे धरणगाव अध्यक्ष विकास मालचे, उपाध्यक्ष संभाजी सोनवणे, पोलीस पाटील सुनिल सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, नायब तहसीलदार संदीप मोरे तसेच धरणगाव तहसील व गटविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन आर.डी.महाजन‌ यांनी केले. आभार गटवि,कास अधिकारी सुशांत पाटील यांनी मानले.

०००००