जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण             

अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

सोहळ्याला विशेष पोलिस  महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सोहळ्याच्या प्रारंभी  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती. डॉ. पाण्डेय यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन, वज्र वाहन, फॉरेन्सीक वाहन, वरुण वाहन, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यासह शालेय विद्यार्थी, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील नागरिक आदी उपस्थित होते.  प्रा. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

000