जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी ४०० कोटींचा निधी; शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – डॉ. विजयृकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 31जुलै 2024 (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील वाड्यां- वस्त्या प्रकाशमान करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नाभुतोनाभविष्यती असा 400 कोटी रूपयांचा निधी विद्युतीकरणासाठी दिला असून शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील उमरदे आणि कोपर्ली येथे गृहपयोगी वस्तु, सुरक्षा संच वितरण तसेच विविध विकास कामांच्या भुमीपुजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जितेंद्र पाटील, ए.बी. गांगुर्डे, सागर साळुंखे, रामभाऊ बेंद्रे, कमलेश चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, आनंदा बोराळे, मल्हारी पाटील, अर्जुन सोनवणे, गोविंदा जगताप यांच्यासह परिसरातील अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, विद्युतीकरणात पिछाडीवर असलेला जिल्ह्याच्या विद्युतीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी चालू वर्षात सुमारे 400 कोटी रूपयांचा निधी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. येत्या काही महिन्यातच जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या प्रकाशमान झालेल्या आपल्याला दिसतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील यात्रा स्थळांच्या विकासाबरोबरच मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठीही भरीव निधी दिला जात आहे. गावातील सुख-शांती, धार्मिकता, अधियात्मिकता, सांस्कृतिक मुल्ये वृद्धींगत व्हावी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी ही भरीव निधी दिला जात आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम करत असलेल्या नागरिकांना म्हणजेच बांधकाम कामगारांच्या हितार्थ एक अतिशय महत्वपूर्ण व लाभदायी योजना सुरू केली जिचे नाव बांधकाम कामगार योजना 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना गृहोपयोगी वस्तु व कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुरक्षाविषयक साधनांचा संच दिला जातो.