ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.