टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क

सांगलीदि. 30 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये  भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

44-सांगली लोकसभा मतदार संघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 1502 व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीव्दारे मतदान करून घेतले जाणार आहे.  या मतदारांचे मतदान दि. 1, 2 व 3 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे.

44-सांगली लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या आणि सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यप्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  तर सांगली लोकसभा मतदार संघाबाहेर जे अधिकारी/कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना विधानसभा मतदार संघस्तरावर सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन  2 ते 4 मे 2024 या कालावधीत मतदान करता येणार आहे.

000