‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ पुस्तकातून भारतीयांच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास वाचकांसमोर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणारे “ट्रान्सफर ऑफ पॉवर” हे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षाचा गौरवशाली इतिहास असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था संचालित प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘अश्वमेध 2024’क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आणि “ट्रान्सफर ऑफ पॉवर” पुस्तकाचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी मंत्री तथा लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिश चतुर्वेदी, लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेच्या सचिव आभा चतुर्वेदी, माजी आमदार आणि संस्थेच्या संचालक मंडळाचे संचालक दुष्यंत चतुर्वेदी, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, डॉ. सतिश चतुर्वेदी लिखित “ट्रान्सफर ऑफ पॉवर” पुस्तकात विदर्भातील गांधीवादी चळवळीचा वर्ष 1920 ते 1942 दरम्यानचा अभ्यासपूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. या विषयावरील डॉ. चतुर्वेदी यांचे संशोधन कार्य महत्वपूर्ण असून केंब्रिज,ऑक्सफर्ड आदी जगातील नामांकित विद्यापीठाच्या ग्रंथालयात, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमीमध्ये या संशोधनाला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

प्रदीर्घ संशोधनाअंती हे पुस्तक तयार झाले असून यातील दहा पृष्ठ हे निव्वळ संदर्भाचीच आहेत. भारतदेशाच्या तत्कालीन बलस्थाविषयीच्या माहितीचे तक्ते या पुस्तकात आहेत. जगातील सर्वात मोठया जीडीपीचा देश ते ब्रिटिशांच्या अंमलातील भारतदेश असा प्रवास यात दिसून येतो. भारताच्या हस्तांतरणातील विस्टन चर्चिल यांची भूमिका,देशाचे विभाजन आणि त्याचा परिणाम पुस्तकात मांडला आहे. भारतीय इतिहासावरील हा एक उत्तम संदर्भग्रंथही ठरेल, असे श्री. फडणवीस म्हणाले.

इतिहासापासून प्रेरणा घेवून आपण उज्ज्वल भविष्याचा वेध घेत असतो.भारतदेशाची दहा हजार वर्ष जुनी गौरवशाली संस्कृती आहे.मात्र,दीड हजार वर्षाच्या गुलामीमुळे संस्कृतीने देशाचा गौरव हिसकवण्याचा प्रयत्न केला. देशात ही गौरवशाली संस्कृती पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर याचे उत्तम उदाहरण असून 500 वर्षापूर्वीचे सांस्कृतिक वैभव या माध्यमातून पुन्हा स्थापित झाले आहे.भारतदेशाने जगातील पाचव्या अर्थव्यवसस्थेचे स्थान मिळविले असून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. भेदभाव रहित समाज रचना निर्मितीसह विकसित भारताकडे देश अग्रेसित होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतिश चतुर्वेदी यांनी ही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. तत्पूर्वी, “अश्वमेध 2024’क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यावेळी विद्यार्थ्यांनी वैविद्यपूर्ण सादरीकरण केले.
00000