ठाणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ठाणे, दि. 17 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देशही श्री.चोक्कलिंगम यांनी दिले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम हे ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी श्री.चोक्कलिंगम यांनी संवाद साधून माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम, सर्व नोडल अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील निवडणुकीच्या संपूर्ण तयारीची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सोसायट्यांच्या सचिव/अध्यक्षांच्या मदतीने मतदान टक्केवारीसाठी प्रयत्न करा
श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पादर्शक व निर्भिड वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित काम करावे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना घरोघरी पाठवून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी त्या सोसायट्यांच्या सचिव व अध्यक्षांची मदत घ्यावी. त्यासाठी सचिव व अध्यक्षांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून घोषित करावे. शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत पालकांपर्यंत संदेश पोहचवावा.
माथाडी कामगार, विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी यांनी मतदान करावे, यासाठी संबंधित उद्योग/संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच कामगार संघटनांशी संपर्क साधून आवाहन करावे. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेलिब्रेटींकडून आवाहन करावे
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी सेलिब्रिटी, मान्यवरांची मदत घ्यावी. मतदानाचे आवाहन करणारी व्हिडिओ, रिल्स तयार करून ते ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांतून प्रसारित करावे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्या सेलिब्रेटींचे आवाहनाचे बाईटही समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करावेत.

मतदान केंद्रांची माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करावा
मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना सुखद वाटावे, यासाठी केंद्रात व परिसरात वातावरण निर्मिती करण्यात यावी. पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, व्हिलचेअर, सेल्फी पॉईंट आदींची सोय करावी. तसेच मतदारांना रांगेत जास्त वेळ उभे राहू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उभारता येईल का हे पाहावे. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा द्यावी. तसेच मतदान केंद्रांची जागा सुलभपणे सापडण्यासाठी क्यूआर कोड, गुगल मॅपचा वापर करून माहिती द्यावी. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आचारसंहिता भंगाविरुद्ध गुन्हे दाखल करा
शांततेत व निर्भिड वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवावा. तसेच आचारसंहिता भंग होत असल्यास तातडीने गुन्हे दाखल करावे. तसेच कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच चुकीची माहिती प्रसारित होत असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव न सापडण्याच्या, नावे गायब होण्याच्या तक्रारी मतदानाच्या दिवशी येत असतात. अनेक मतदारांची नावे ही दुसऱ्या मतदार यादीत गेलेली आढळून येतात, त्यामुळे त्यांना नावे सापडत नाहीत. अशा मतदारांना मदत करण्यासाठी व तक्रारींची दखल घेऊन नावे शोधण्यासाठी हेल्पडेस्क तयार करण्याचे निर्देशही श्री. चोक्कलिंगम यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे, तीनही पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तीनही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघात केलेल्या तयारीची माहिती सादर केली.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ठाण्यातील स्ट्रॉंगरुमला भेट

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्री. एस.चोकलिंगम यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली.

ठाणे जिल्ह्यात येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन स्ट्रॉंगरुमध्ये ठेवण्यात येणार आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रुम होरायझन स्कूल येथे आहे. या स्ट्रॉंग रुमची पाहणी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये आदीउपस्थित होते. यावेळी श्री. शिनगारे व श्रीमती जायभाये यांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. श्री. चोक्कलिंगम यांनी स्ट्राँगरुमची व्यवस्था चांगली केल्याचे समाधान व्यक्त केले.

०००००